हिंगोली (Avinash Bangar's death) : काल ५ ऑक्टोंबर रोजी मारवाडी गल्ली हिंगोली येथे फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत हिंगोलीतील अविनाश काशिनाथ बांगर, वय २६ वर्ष, यांनी दुसर्यांचे प्राण वाचवण्यासाठी धाव घेतली आणि या प्रयत्नातच त्यांनी स्वतःचा प्राण गमावला. आगीने रौद्ररूप धारण केले असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविनाश यांनी इतरांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या धाडस आणि मानवतेच्या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या जाण्याने हिंगोली शहरावर शोककळा पसरली आहे.
विशेष म्हणजे अविनाश हा मोटार सायकलवरून रस्त्यावरून जात असताना त्याला ही आग दिसून आली. काही अंतरावर मोटार सायकल उभी करून त्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.