दिवसभर ज्ञानदान, रात्री पहारा; शिक्षकांना ‘शिक्षक’ ठेवा, सुरक्षारक्षक बनवू नका: सीटू संघटनेचा इशारा
गडचिरोली (Ashram School Teacher Protest) : ज्या दिवशी शिक्षकांच्या ज्ञानदानाचा आणि त्यागाचा गौरव व्हायला हवा, त्याच शिक्षकदिनी आश्रमशाळेतील शिक्षकांना हातावर काळ्या फिती बांधून प्रशासनाचा निषेध करण्याची वेळ आली, ही शिक्षण व्यवस्थेसाठी निश्चितच चिंताजनक बाब आहे. आदिवासी विकास विभागाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात राज्यभरातील आश्रमशाळा शिक्षकांनी (Ashram School Teacher Protest) काळ्या फिती लावून आपला संताप व्यक्त केला.
आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मात्र, सुरक्षेच्या नावाखाली अध्यापन करणाऱ्या शिक्षकांवरच अतिरिक्त जबाबदाऱ्यांचा डोंगर लादला जात असल्याचा आरोप सीटूने केला आहे. दिवसभर वर्गात अध्यापन आणि रात्री पहारा, अशी दुहेरी भूमिका शिक्षकांकडून अपेक्षित केली जात असेल तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा बळी जाणार नाही का? असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.
शिक्षकांना अध्यापन, शैक्षणिक नियोजन, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यातच रात्रीची देखरेख, पहारा किंवा इतर अतिरिक्त जबाबदाऱ्या देण्यात आल्यास त्यांच्या आरोग्यावर, विश्रांतीवर आणि कौटुंबिक जीवनावर परिणाम होतो. शिक्षकांकडून २४ तास सेवा घेण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे, अशी भूमिका शिक्षकांनी मांडली.
संहिता एका बाजूला, प्रत्यक्ष कारभार दुसऱ्या बाजूला?
आश्रमशाळा संहितेनुसार अधीक्षक-अधीक्षिका यांच्यात प्रभाराची जबाबदारी देण्याची व्यवस्था असताना प्रत्यक्षात शिक्षकांकडे प्रभार सोपविण्याच्या प्रकारावर सीटूने गंभीर आक्षेप घेतला आहे.
“नियम जर आहेत, तर त्यांची अंमलबजावणी का होत नाही?” असा थेट सवाल संघटनेने प्रशासनाला केला आहे.
सेवाशर्ती आणि निर्धारित कामाच्या तासांचे पालन, साप्ताहिक सुट्टीचा अधिकार, विश्रांतीचा हक्क यांचा विचार न करता सतत अतिरिक्त कामाचा बोजा टाकला जात असल्यास त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
महिला शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
महिला शिक्षकांना रात्री विविध कामांसाठी सक्ती केली जात असल्याच्या तक्रारींबाबतही संघटनेने आवाज उठविला आहे. महिला हक्क, विशाखा मार्गदर्शक तत्त्वे, GAD आदेश आणि संबंधित सुरक्षा नियमांचे पालन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महिला शिक्षकांच्या सुरक्षिततेशी तडजोड कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही, अशी भूमिका सीटू संघटनेने घेतली आहे.
घटना घडली की निलंबनाचा ‘फॉर्म्युला’?
आश्रमशाळेत एखादी अप्रिय घटना घडल्यास तिची संपूर्ण चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याऐवजी दोष सिद्ध होण्यापूर्वीच शिक्षक, मुख्याध्यापक अथवा अधीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई होत ख़असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
“दोष सिद्ध होण्यापूर्वी शिक्षा कशी?” हा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
शिक्षकांवर कारवाई करण्यापूर्वी निष्पक्ष चौकशी, वस्तुस्थितीचा अभ्यास आणि संबंधितांची बाजू ऐकून घेणे आवश्यक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
कॅमेरे सुरक्षेसाठी की सततच्या निगराणीसाठी?
आश्रमशाळांतील व्हिडिओ देखरेख व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असला तरी कर्मचाऱ्यांची गोपनीयता, प्रतिष्ठा आणि विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचे संरक्षण झाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.
घटनात्मक हक्कांचा मुद्दा ऐरणीवर
सीटून संघटनेने शिक्षकांच्या घटनात्मक हक्कांचा, मानवी हक्कांचा, आरोग्याचा, विश्रांतीचा आणि कौटुंबिक जीवनाचा प्रश्न उपस्थित केला आहे. संविधानातील कलम १४, १५ आणि २१ अंतर्गत समानता, भेदभावविरोधी संरक्षण आणि जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या व्यापक अधिकारांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपल्या कार्यपद्धतीचे परीक्षण करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
“शिक्षकांना शिकवू द्या; पहारा देण्याची सक्ती थांबवा!”
सीटूच्या अध्यक्षांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना म्हटले की,
“आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा ही आमचीही जबाबदारी आहे. मात्र सुरक्षेच्या नावाखाली शिक्षकांच्या सेवाशर्ती, कामाचे तास, साप्ताहिक विश्रांती, महिला सुरक्षा आणि मानवी हक्कांवर गदा आणली जाणार असेल, तर ते आम्ही स्वीकारणार नाही. शिक्षक हा ज्ञानदानासाठी आहे. दिवसभर अध्यापन करून रात्री पहारा देण्याची जबाबदारी लादणे योग्य नाही. प्रशासनाने शिक्षकांना संशयित किंवा आरोपी समजण्याऐवजी शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणून सन्मानाने वागवावे. नियमबाह्य आदेश आणि दडपशाही थांबली नाही तर सीटूचा लढा अधिक तीव्र केला जाईल.” -- रामदास खवशी विभागीय अध्यक्ष सीटू राज्य संघटना नागपूर
शिक्षक दिनाचा काळा दिवस प्रशासनासाठी इशारा!
शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार होण्याऐवजी त्यांच्या हातात काळ्या फिती दिसणे ही केवळ आंदोलनाची बाब नाही; ही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उमटलेली काळी छाया आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
आश्रमशाळा म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याची शिदोरी. या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना मानसिक शांतता, पुरेशी विश्रांती, सुरक्षित वातावरण आणि सन्मानजनक कार्यपरिसर मिळणे गरजेचे आहे.
सुरक्षा व्यवस्था मजबूत करा; पण शिक्षकांच्या हक्कांची किंमत मोजून नव्हे.
शिक्षकदिनी बांधलेल्या काळ्या फिती प्रशासनासाठी एकच संदेश देत आहेत.।
“शिक्षकांच्या संयमाची परीक्षा घेवू नका
त्यांचेवरील अन्याय थांबवा !!!
त्यांना सन्मानाची वागणूक द्या
शिक्षणाला न्याय द्या “