पनवेल (Anganwadi) : पनवेल तालुक्यातील नांदगाव येथील एका अंगणवाडीतील चिमुरडीवर अत्याचाराचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये अंगणवाडी सेविकेने एका लहान मुलीला जमिनीवर पाडून तिच्या छातीवर पाय ठेवत लाथ मारल्याचे दिसत आहे. या घटनेचे दृश्य अत्यंत धक्कादायक असल्याने सोशल मीडियावर त्याचा वेगाने प्रसार झाला असून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या व्हिडिओनंतर स्थानिक नागरिकांनी अंगणवाडीबाहेर एकत्र येत संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ अटक करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. सरकारी अंगणवाडी केंद्रातील या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Panvel, Maharashtra - A horrifying video showing a woman brutally kicking and assaulting a small girl has gone viral on social media, sparking widespread outrage. The incident took place in Nandgaon village under Panvel taluka. The victim is a minor girl studying at a local… pic.twitter.com/MOFHwTewwQ
— NextMinute News (@nextminutenews7) June 25, 2026
दरम्यान, या प्रकरणाची नोंद करून नवी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. व्हायरल व्हिडिओची सत्यता, नेमका घटनाक्रम आणि अंगणवाडी व्यवस्थापनाची भूमिका यांची तपासणी वेगाने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधितांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले असून, अंगणवाडीतील इतर बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष पथक घटनास्थळी पाठविण्यात आल्याची माहितीही दिली आहे.
एका स्थानिक पालकाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, "हे दृश्य पाहून मन सुन्न झाले. आपल्या लहान मुलांना आपण विश्वासाने अंगणवाडीत पाठवतो. अशा क्रूरतेला कोणतीही माफी नसावी. दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे," असे म्हटले.
या घटनेनंतर बालहक्क कार्यकर्ते आणि विविध नागरिक संघटनांनी राज्य सरकारकडे अंगणवाड्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करणे, बालसंगोपन कर्मचाऱ्यांची नियमित मानसशास्त्रीय तपासणी करणे आणि देखरेख व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, अल्पवयीन पीडितेची ओळख आणि गोपनीयता जपण्यासाठी नागरिकांनी संबंधित व्हिडिओ पुढे शेअर करू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. तसेच कायदेशीर प्रक्रियेद्वारे या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.