दोन महिला पोलिसांच्या जाळ्यात; दारूसह रसायन जागेवरच नष्ट
चिखली (Illegal Liquor Action) : अमडापूर पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेतल्यापासून अवैध धंद्यांविरुद्ध कडक भूमिका घेणारे ठाणेदार जयसिंग राजपूत यांनी पुन्हा एकदा आपली धडाकेबाज कामगिरी दाखवून दिली. डोंगरशेवली शिवार येथील दुर्गम दरी-खोऱ्यांतील जंगलामध्ये सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर ठाणेदार राजपूत यांनी स्वतः पथकासह धाड टाकून दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. या धडक कारवाईत दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली असून, दारू आणि सडवा जागेवरच नष्ट करण्यात आला आहे.
जंगलात थेट शिरले ठाणेदार!
डोंगरशेवली शिवारातील अत्यंत दुर्गम अशा दरी-खोऱ्यांत छुप्या पद्धतीने हातभट्टीची दारू गाळली जात असल्याची पक्की गोपनीय माहिती ठाणेदार जयसिंग राजपूत यांना मिळाली होती. दुर्गम रस्ता आणि जंगलाचा फायदा घेऊन पोलीस चकवा देतील, ही शक्यता ओळखून ठाणेदार राजपूत यांनी स्वतः आपल्या फौजफाट्यासह थेट जंगलात धडक दिली. पोलिसांचा हा अनपेक्षित छापा पाहून दारू माफियांची चांगलीच पळापळ झाली.
दोन महिलांवर गुन्हा, मुद्देमाल जप्त
या कडक कारवाईदरम्यान डोंगरखंडाळा (ता. चिखली) येथील दोन महिला आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: आरोपी रेखाबाई सुनील पवार: हिच्याकडून १४ लीटर हातभट्टी दारू (किंमत ₹६००) आणि ₹३,४३० रुपयांचा दारू बनवण्याचे साहित्य व इतर मुद्देमाल जप्त केला. आरोपी मंगलाबाई गणेश पवार: हिच्या ताब्यातून १४ लीटर हातभट्टी दारू (किंमत ₹७००) आणि ₹३,६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरील दारू गाळण्याचे कच्चे रसायन (सडावा) जागीच नष्ट करून संपूर्ण अड्डा उद्ध्वस्त केला.
ठाणेदारांच्या 'या' शिलेदारांनी बजावली कामगिरी
गुन्हेगारांवर वचक निर्माण करणाऱ्या या कारवाईत ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्यासोबत एएसआय निवृत्ती चेके, पोलीस हवालदार बिलगे, पोलीस शिपाई चंद्रशेखर मुरडकर, दुर्गासिंग ठाकूर, रंजीत सरोदे, चालक चिंचोले आणि महिला पोलीस अंमलदार वैशाली आराख यांनी मोलाची कामगिरी बजावली.
अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले!
याप्रकरणी दोन्ही आरोपी महिलांविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास बीट अंमलदार एएसआय निवृत्ती चेके करीत आहेत. ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या या कडक आणि तडफदार कारवाईमुळे अमडापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून, नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे.