नागपूर (Senior Bhosala Palace Ganeshotsav) : हिंदवी स्वराज्याचे विस्तारक, नागपूर राज्याचे संस्थापक सेनासाहेब सुभा श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (प्रथम) यांच्या कालखंडापासून, इसवी सन १७२८ पासून सुरू असलेली सिनीयर भोसला पॅलेस येथील गणेशोत्सवाची २९८ वर्षांची परंपरा यंदाही कायम राहिली. महाल येथील श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले यांच्या सिनीयर भोसला पॅलेस येथे विराजमान असलेल्या श्री गणेशमूर्तीचे आज गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी, दशमीला पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.
या (Senior Bhosala Palace Ganeshotsav) गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल २९८ वर्षांपासून श्री गणेशमूर्तीच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एकाच आकाराची आणि एकाच रंगाची गणेशमूर्ती परंपरेनुसार विराजमान केली जाते. तसेच नागपूरकर भोंसलेकालीन सिरपेज-तुरा असलेली पारंपरिक पगडी गणरायांना परिधान केली जाते.
गणेशमूर्तीचे आगमन तसेच विसर्जनही पालखीतून करण्याची परंपरा येथे आजही जपली जात आहे. (Senior Bhosala Palace Ganeshotsav) विसर्जनाच्या दिवशी गणरायांना पालखीतून मिरवणुकीने नेऊन पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. या अनोख्या आणि ऐतिहासिक परंपरेमुळे सिनीयर भोसला पॅलेस येथील गणेशोत्सवाला नागपूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.