२५ सप्टेंबरला मध्यरात्री २ वाजता महापूजा
पहाटे ४ वाजता महाआरती होणार
महाआरती नंतर भाविकांना रांगेमध्येच नवसाचे मोदक वाटप होणार
हिंगोली (Hingoli Modak Festival) : शहरातील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पाचा उत्सव सुरू आहे. २५ सप्टेंबरला मंदिर संस्थानातर्पेâ नवसाचे १ लाख ५१ हजार मोदक वाटप केले जाणार आहे. मध्यरात्री महाआरती नंतर रांगेतून भाविकांना नवसाचे मोदक वाटप करण्याचे नियोजन केले आहे.
हिंगोली शहरातील गड्डेपीर गल्लीमधील (Hingoli Modak Festival) श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पाची अख्यायिका महाराष्ट्रासह इतर राज्यातही सर्वदूर प्रसिध्द झाली आहे. गणेश उत्सव कालावधीत गणपती बाप्पाचे जे नवसाचे मोदक वाटप केले जातात. त्याकरीता प्रत्येकवर्षीच लाखो भाविक गणेश उत्सव कालावधीत येत असतात. ज्या ज्या भाविकांचा नवस पुर्ण झाला असे भाविक गणेश उत्सव कालावधीत आपल्या मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवित असतात. १४ सप्टेंबर पासून गणपती बाप्पाचा उत्सव सुरू झाला आहे. या दरम्यान मोठ्या संख्येने भाविकांनी चिंतामणी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर संस्थानने विशेष खबरदारी घेतली आहे. या सोबतच कुठेही गोंधळ होऊ नये, या करीता पोलिस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त दिला आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना भोजनरूपी प्रसादाचे वाटप प्रत्येक दिवशी सुरूच आहे.
२४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरापासून पालखी कावड काढली जाणार ही कावड माहेश्वरी भवन, मंगळवारा दत्त मंदिरापासून कयाधू नदीवर पोहचणार आहे. सदर कावड परतीच्या मार्गाने कयाधू नदीपासून दत्त मंदिर, माहेश्वरी भवन, लाभ्या मारोती, कासारवाडा, टाले हॉल, ग्रामीण पोलिस ठाणे, जुने ग्रामीण पोलिस ठाणे, मेडीकल लाईन, महावीर चौक, महात्मा गांधी चौक, कपडा गल्ली, मारवाडी गल्ली, मसानीपेठ, जमादार विहिर मार्गे चिंतामणी गणपती मंदिरात पोहचणार आहे.
अनंत चतुदर्शीला २५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता कयाधू नदीवर कावड जाणार आहे. त्यानंतर मध्यरात्री २ वाजता श्रींची महापूजा केली जाणार आहे. यामध्ये श्रींच्या मुर्तिला अलंकार, वस्त्र, मानाचे २१ सोवळे, मानाचे डोळे, महानैवैद्य, दाखवून नवसाचे १ लाख ५१ हजार मोदकाचा नैवेद्य दाखविल्या जाणार आहे. त्यानंतर पहाटे ४ वाजता महाआरती सुरू होणार आहे. ही महाआरती झाल्यानंतर भाविकांना रांगेतूनच नवसाचे मोदक वाटप केले जाणार आहेत.
अनंत चतुदर्शी निमित्त लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानच्या वतीने मंदिरापासून मारवाडी गल्ली, जुने ग्रामीण पोलिस ठाणे, मेडीकल लाईन, महावीरस्तंभापर्यंत बॅरीकेटींग लावण्यात आली आहे. याच चौकात भव्य वाटरप्रुफ मंडप उभारण्यात आले आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, या करीता रांगेत काही ठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था देखील करण्यात आली आहे. यासोबतच महात्मा गांधी चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत मोठा मंडप उभारण्यात आला आहे. कुठेही अनूचित घटना घडू नये, यासाठी मंदिर संस्थानचे स्वयंसेवक, सामाजिक संघटना आणि पोलिस प्रशासनालाही सज्ज ठेवण्यात आले आहे.